आदर्श पालकत्व लेख क्रमांक 3 (ideal parenting)adarsh palaktv

आदर्श पालकत्व लेख क्रमांक 3 (ideal parenting) adarsh palaktv

मागच्या लेख क्रमांक- 2 मध्ये आपण एक सूत्र बघितले की मुलांमुळे किंवा तुमच्या वैयक्तिक काही कारणामुळे तुमच्या समोर जो प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगात गोंधळून न जाता शांत राहणे व संयम बाळगणे  शांततापूर्वक वर्तन ठेवणे 
      आजच्या या तिसऱ्या लेखांमध्ये आपण एक दुसरे नवीन सूत्र शिकणार आहोत सूत्र सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती अशी                 एकदा एक  मनुष्य मोकळ्या माळरानावर फिरण्यासाठी जातो .त्या मनुष्याला घोड्यांचे फार आकर्षण असते. गवतावरून फिरत असताना समोर त्याला आठ-दहा घोडे गवत खाताना दिसले .तो घोड्याच्या दिशेने धावत सुटला , पण तिथे पोहोचेपर्यंत सर्व घोडे इतरत्र पळून गेले. एक घोडा मात्र तिथेच होता मग तो माणूस त्याच्या जवळ गेला. पण बघतो तर काय तो घोडा नसून एक गाढव होते. मनुष्य निराश झाला. पण तो मनुष्य त्या गाढवाला घरी घेऊन आला आणि त्याची काळजी घेऊ लागला . काही दिवसांनी गाढव जरा धष्टपुष्ट झाल्यानंतर गाढवावर बसून फिरण्यासाठी निघाला . आता काय होईल तुम्ही सांगा. ते गाढव घोड्या इतके वेगाने धावू शकेल का अर्थातच नाही घोड्याची शक्ती व त्याचे गुण हे गाढवा पेक्षा वेगळेच आहेत ; आणि गाढवाचेही काही गुण हे घोड्यापेक्षा वेगळे आहे.
        अर्थात 
     दोन्ही प्राणी आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत .पण गाढवाचा घोडा आणि घोड्याचा गाढव करण्यात काहीच मजा नाही ;आणि फायदा नाही. तसे केले तर त्याचा काही उपयोग सुद्धा होणार नाही.
     -- या गोष्टीवरून काही कळत आहे का आणि नसेल कळत तर अजून काही प्रसंग मी सांगतो ते नीट वाचा.
            प्रसंग  क्रमांक एक
   माझा एक मित्र मातीपासून छान वस्तू बनवतो. त्याने त्याच्या मुलासाठी मातीपासून छान बाहुली व प्राणी तयार केले  . मीही तसे बाहुली व प्राणी बनवण्याचा प्रयत्न केला ; पण प्रयत्न फसला बाहुली व छान- छान प्राणी सोडून बाकी सर्व आकार आपोआप तयार झाले😊. मग मी तो नाद सोडला . माझा मुलगाही मला म्हणाला "त्या काकांनी किती छान बनवले आहेत. तुम्हाला तितके छान बनवता येत नाही " 
               प्रसंग क्रमांक दोन
       अजून एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो .माझ्या मुलाला घेऊन मी शेतात गेलो असताना  विहिरी जवळच्या एका झाडावर सुगरण पक्षाने छान खोपा बनवलेला होता . त्यातील एक रिकामा व पक्षी न राहणारा खोपा आम्ही घरी आणला .तो खोपा आमच्या शेजाऱ्याने माझ्याकडून मागून घेतला व काही दिवसांनी त्याने दुसरा एक छानसा पक्षांचा खोपा तयार केला. ते बघून मीही तसा बनवण्याचा प्रयत्न केला . अर्थातच परत माझा प्रयत्न फसला या सर्वांचा कंटाळा येऊन मी माझ्या मुलाला जवळ घेतलं आणि तेव्हा त्याला गोष्टीच्या पुस्तकातील छान- छान गोष्टी मोठ्याने वाचून दाखवू लागलो. मी शिक्षक असल्याने वाचनातील चढ-उतार व हावभाव आवाजामधील विविधता या सर्व गोष्टी मला माहित होत्या. म्हणून जेव्हा जेव्हा गोष्ट वाचून दाखवत असेल तेव्हा माझा मुलगा शांतपणाने त्या सर्व गोष्टी ऐकायचा .व त्याला गोष्टी ऐकण्यात ही मजा वाटायची .
   पण जेव्हा कधी माझ्या मुलाला घरटे छान बनवणाऱ्या व मुर्त्या बनवणाऱ्या माझ्या मित्रांकडून गोष्ट ऐकण्याची वेळ आली त्यावेळी मात्र तो तेवढ्या मनःपूर्वक ती गोष्ट ऐकत नव्हता व त्याचे अवधान  तिकडे जास्त वेळ टिकत नव्हते . घरी येऊन बऱ्याचदा माझा मुलगा मला असेही म्हटले आहे  की ,"पप्पा तुम्ही गोष्ट फार छान सांगता."
 इथे प्रसंग संपला यावरून तुम्हाला काय  कळते
     ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाची एक वेगळी क्षमता, आवड ,व्यक्तिमत्व असते अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक पालकांचेही एक वेगळे व्यक्तिमत्व असते .कोणताही पालक परिपूर्ण नसतो .
 आजचे पालकत्वाचे सूत्र
     एक चांगला पालक नेहमी स्वतःच्या मर्यादा व त्याच्या अंगी असणारे चांगले कौशल्य ओळखतो .स्वतःविषयी व स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाविषयी तो सतत सजग राहतो. स्वतःमधील प्लस पॉईंट व निगेटिव पॉईंट त्याला माहित असतात .म्हणून तुमच्या मुलांसमोर वागताना तुम्हाला तुमच्या मर्यादा कोणत्या आहेत हे चांगल्या पद्धतीने माहित असणे गरजेचे आहे. म्हणजे माझ्या दोन्ही मित्रासारख मला कला अवगत नसल्या तरीदेखील मात्र गोष्ट छान पद्धतीने रंगवून सांगण्याची कला  माझ्या अंगी नक्कीच आहे; आणि माझ्या मित्रांकडे तरी कुठे माझ्यासारखी कला होती .
     तुमची कौशल्य तुम्हाला माहित असणे फार महत्वाचे आहे आणि स्वतःच्या बलस्थानांवर तुमचा विश्वास हवा ,त्यामुळे तुम्ही करू शकत नाही अशा गोष्टी इतर पालकांना करताना बघूनही तुम्हाला अपूर्णपणाची भावना येणार नाही .आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते पालक इतर सर्वच गोष्टी करू शकतात असेही नाही, परंतु तरीही मानवी स्वभावानुसार कधी तुम्हाला कमीपणाची भावना वाटली किंवा गोंधळलेली अवस्था निर्माण झाली तर लेख दोन मध्ये आपण जे सूत्र शिकलो ते आठवा शांत राहा ,विचार करा व संयमाने निर्णय घ्या. अजिबात गोंधळून जाऊ नका .

मला वाटतं आजच्या या आदर्श पालकत्व लेखमालेतील तिसऱ्या लेखाच्या  सुत्रा सह  दुसऱ्या लेखातील  सूत्राची उजळणीही झालेले आहे.
 हो की नाही !!!
      लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पोस्ट अधिकाधिक शेअर करा. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारच्या समस्या असतील तर ते ही कळवा. मी माझ्या परीने आपणास योग्य ते मार्गदर्शन किंवा मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.





Comments

Popular posts from this blog

आदर्श पालक (लेख क्रमांक 1(adarsh palaktv)ideal parenting